सोमवार, १० मार्च, २०१४

विस्थापित-

मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ यांच्या सीमारेषेवर असलेल्या आमच्या गावात एका आदिवासी शेतकऱ्याच्या घरी असंच एक विस्थापित झालेलं माकड येऊन राहू लागलं होतं. ते भाकरी किंवा भात खात असे. बिडी प्यायलाही ते शिकलं होतं! एवढंच नव्हे तर, आपल्या शेतकरी-मालकाबरोबर ते मोहाच्या फुलांची दारूही मातीच्या भांड्यातून किंवा पेल्यातून पीत असे...तो शेतकरी रानात शेळ्या-मेंढ्या चरायला घेऊन जाई, तेव्हा ते माकडही त्याच्याबरोबर जाई. "ते' आपल्या "कुटुंबकबिल्या'सह त्या महामार्गाच्या मध्यभागी गुपचूप, उदास बसलेले आढळतात.. काहीजण इथं...काहीजण तिथं... 
जवळपास दीडशे-दोनशे किलोमीटरचा तो महामार्ग. कुठल्याशा मलेशियन कंपनीनं अतिशय दिमाखदार बनवला आहे हा रस्ता...एकेकाळी बहरलेलं; पण आता उजाड-बोडकं झालेलं बोरू-बांबू-मोह आदी वृक्षांचं जंगल या रस्त्याच्या आसपासच आहे...याच जंगलाच्या आसपासच्या महामार्गावर ते झुंडीझुंडीनं बसलेले दिसतात. कुठंतरी जाण्यासाठी बसची वाट पाहत आहेत, असंच जणू त्यांच्याकडं पाहून वाटावं. कुठल्यातरी तीर्थयात्रेसाठी...कुठल्यातरी खेड्यातल्या यात्रेसाठी किंवा आदिवासी पाड्यावरच्या बाजारासाठी... अशा ठिकाणी जाण्यासाठी कितीतरी किलोमीटरची पायपीट करावी लागते... ही पायपीट टाळण्यासाठी किंवा निदान कमी अंतर चालावं लागावं म्हणून कुण्या ट्रकचालकाची वाट पाहत बसले आहेत ते जणू...कुणी ट्रकचालक येईल आणि आपल्याला त्याच्या गाडीत मागच्या बाजूला बसवून नेईल, अशा आस बाळगत...! 

ते भिकारी तर नव्हेत ना? किंवा दुष्काळग्रस्त? पोट भरण्यासाठी कुणाच्या तरी मदतीची वाट पाहत, कुणी कनवाळू माणूस येऊन भाजी-भाकरी देईल या आशेनं तर ते बसले नसावेत ना ? त्यांना मे-जूनमधल्या धुपल्या-तापल्या उन्हाची पर्वा नाही की जुलै-ऑगस्टमधल्या जोरदार पावसाची तमाही...! 

ते महामार्ग ताब्यात घेतात...कुठं कुठं तर ते आख्ख्या महामार्गावर ठिय्या देऊन असतात. आपली लहानगी-चिमुरडी पोरं, कुटुंबातली म्हातारीकोतारी मंडळी आणि इतर कुटुंबीयांसह... 

तुम्ही कितीही हॉर्न वाजवा....ते रस्त्यावरून हटता हटत नाहीत. जोरजोरात वाजणाऱ्या हॉर्नच्या दिशेनं किंवा त्यांना हटवण्यासाठी केल्या जाणाऱ्या आरड्याओरड्याकडं ते मान वर करून बघत म्हणून नाहीत. रस्त्यावरून त्यांनी बाजूला व्हावं म्हणून वाहनचालकांनी अचकट-विचकट शिव्या दिल्या तरी ते आपले ढिम्मच! 

त्या सगळ्यांनी "नशापाणी' केलं आहे आणि ते त्याच अमलात आहेत, असंही वाटून जातं...!आपली भूक भागवण्यासाठी धुंदी आणणारा जंगली कण्हेर किंवा धोत्रा या वनस्पती तर त्यांनी खाल्लेल्या नसतील? या भागातल्या जंगलात उगवून आलेल्या गांजा-भांग यांचंही व्यसन बहुधा त्यांना लागलेलं असावं...ते पक्के नशाबाज झालेले आहेत...! 

दिल्लीतल्या लाल किल्ल्याचं मैदान, निगमबोध घाट, इंटरस्टेट बस टर्मिनसच्या आसपासचा परिसर, जुनी दिल्ली, पहाडगंजचं रेल्वे स्टेशन किंवा दरियागंज परिसरातल्या उड्डाणपूल, त्या उड्डाणपुलाचा खालचा परिसर...अशा सर्व ठिकाणी मळक्‍या-फाटक्‍या चिंध्याचांध्यांतले असंख्य गर्दुल्ले जसे दिसतात, तसेच दिसत आहेत ते सगळे... 

ते विमनस्क आहेत...सुन्न मनोवस्थेत आहेत. त्यांना कसलीच शुद्ध नाहीय...काळ-वेळ-स्थळ-ठिकाण यांच्या जाणिवेपासून ते पार दूर गेलेले आहेत...ते निर्विकार वाटतात...शून्यमनस्क वाटतात...ते कुणी संन्यासी, अवधूत, योगी आहेत की वंचित-उपेक्षित, सर्वस्व हारलेले, बेघर-अनिकेत आहेत? की कुठल्याशा हिंसाचारामुळं हीनदीन होऊन शरण आलेल्यांचा समूह आहे तो ? 

काहीच कळत नाहीय! 
ती "माणसं' नाहीत, एवढं मात्र नक्की समजतंय...ते लंगूर आहेत. या सगळ्या परिसरात त्यांना "करमुंहा बंदर' अर्थात काळ्या तोंडाची माकडं असं म्हटलं जातं. ती आदिवासी समाजातली किंवा अनुसूचित जाती-जमातीतली माणसं नाहीत; परंतु 
आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती आणि ते यांच्यात एकसमान आणि महत्त्वाची अशी एक "बाब' जरूर आहे... या बाबीकडं समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, एनजीओज्‌ किंवा कार्यकर्ते या सगळ्या मंडळींचं लक्ष कधी जात नाही. 
...आणि ही बाब म्हणजे ः विस्थापन ! त्यांना त्यांच्या "जल-जमीन-जंगल' यांपासून हटवलं गेलं आहे. "विकासा'नं त्यांना हटवलं आहे... ते सगळे "विस्थापित' आहेत. 

तिसऱ्या जगातल्या जवळपास सगळ्याच देशांत विकासाचं जे मॉडेल स्वीकारण्यात आलेलं आहे, त्यातल्या अनेक दुष्परिणामांच्या अनेक पुराव्यांपैकी एक ठळक पुरावा म्हणजे काळ्या तोंडाची ही माकडं! सध्या सगळीकडं "विकासवादा'चा जो वाढता उन्माद सुरू आहे, त्या उन्मादाचा ही माकडं बळी ठरली आहेत. खुळचट विकासवादाचे केविलवाणे बळी! 
विख्यात फ्रेंच तत्त्वज्ञ, इतिहासकार मिशेल फुको यांचं एक पुस्तक काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालं होतं. त्याचं शीर्षक आहे ः "मॅडनेस अँड सिव्हिलायझेशन'. संस्कृतींच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर कुठल्या ना कुठल्या "उन्मादा'ला किंवा "वेडेपणा'ला 
मानवजातीला नेहमीच सामोरं जावं लागतं. अशा "उन्मादां'ची किंवा "वेडेपणां'ची चर्चा त्यांनी या पुस्तकात केलेली आहे. 15 व्या आणि 16 व्या शतकातले युरोपच्या इतिहासातले अनेक दाखले देऊन त्यांनी त्यांचा हा मुद्दा सप्रमाण सिद्धही केला आहे. गतकाळातल्या संस्कृतींचा उन्माद हा इतिहासाच्या विकासातला एक नियंत्रित असा रेटा असतो, असं फुको यांचं मत. हा "उन्माद' किंवा "सणक' ही अशा अनेक रेट्यांपैकीच एक असते आणि असे रेटेच समाजाला पुढं नेत असतात, असं फुको यांचं म्हणणं आहे. आपण सगळे जण आज अशाच एका उन्मादाच्या तावडीत सापडलेलो आहोत. असो. या मुद्द्याची सविस्तर चर्चा या लेखात जागेअभावी करता येणं शक्‍य नाही. त्यामुळं आपण पुन्हा त्या काळ्या तोंडाच्या माकडांकडं वळू या. आजच्या लेखाचा विषयही तोच आहे. 

मध्य प्रदेशातल्या रेवापासून शहडोल आणि अनुपपूर-अमरकंटकपर्यंत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ब्योहारीच्या आसपास ही माकडं दिसू लागतात...वाहनांखाली चिरडली गेलेली त्यांची शवंही अनेक ठिकाणी आढळून येतात...भरधाव वेगानं येणाऱ्या बसच्या किंवा ट्रकच्या चाकाखाली येऊन ही माकडं रोज मृत्युमुखी पडतात. पूर्वीच्या तुलनेत सध्या या माकडांच्या संख्येत किती वाढ किंवा घट झाली आहे, याच्या नोंदी मध्य प्रदेशाचा वन विभाग ठेवतही असेल; परंतु मला त्याविषयी काहीच अंदाज नाही. 

सन 1970 ते 80 च्या दशकातल्या बाणसागर धरणामुळं या माकडांचं विस्थापन झालेलं आहे. हे धरण धरण टिहरी किंवा भडोचसारख्या धरणांसारखं प्रसिद्ध आणि बहुचर्चित नाही; परंतु त्याच्यामुळं होणारा परिणाम मात्र अन्य कुठल्याही धरणानंतर उद्भवणाऱ्या समस्यांपेक्षा किंवा त्यातल्या जलविद्युत प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या समस्यांपेक्षा कमी निश्‍चितच नाही. विंध्याचल डोंगररांगांमधल्या दोन डोंगरांच्या मधून सोन नदी वाहते. या परिसरात आदिवासींच्या अनेक वस्त्या होत्या. वन्य प्राणी होते. तिथल्या घनदाट जंगलांमध्ये बहुमूल्य अशी झाडं-पेडं होती...वनस्पती होत्या...पण ही सोन नदी याच ठिकाणी अडवण्यात आली. अडवलेला हा मोठा जलाशय एखाद्या समुद्राच्या बॅकवॉटरसारखा दिसतो. यातून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं इथल्या आदिवासींना, प्राणिसंपदेला, वनसंपदेला मोठाच तडाखा बसला.तिचं विस्थापन झालं. विस्थापित शेतकऱ्यांना सरकारनं भरपाई दिली; पण आदिवासींपैकी किती आदिवासींना ही भरपाई मिळाली असेल, याचा अंदाज बांधता येणं काही फार कठीण नाही! 

...मग माकडांना तरी भरपाई कशी मिळणार? त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारी जमिनीचं संपादन कसं होणार ? त्यांच्या मालकीची कुठलीही झाडं नाहीत की राईसुद्धा नाही. ते कुठलाही कर भरत नाहीत...त्यांच्याकडं रेशनकार्ड-आधारकार्ड असं काहीही नाही...आणि या माकडांची मतदारयादीतही नोंद नाही ! 
तुम्हाला ते दिल्ली-नोएडा परिसरात आठ-नऊ वर्षांपूर्वी घडलेलं निठारी हत्याकांड आठवत असेल...दिल्लीतला एक धनाढ्य माणूस मोनिंदरसिंग पंढेर यानं त्याचा नोकर सुरेंद्र कोळी याच्या साथीनं नोएडा इथल्या मोठ्या घरात लहान लहान मुलांचं लैंगिक शोषण करून नंतर त्यांना ठार केलं होतं. ही सगळी निरपराध मुलं झोपडपट्ट्यांमधून राहणारी होती. या मुलांच्या मांसाचे कबाबही पंढेरच्या घरातल्या फ्रिजमध्ये पोलिसांना आढळून आले होते! या "हरवलेल्या' लहान मुलांच्या आई-वडिलांचा प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) कोणत्याही पोलिस ठाण्यात नोंदवला गेला नव्हता. कारण, त्यांच्याकडं रेशनकार्ड, विजेचं बिल भरल्याची पावती, मालमत्तेची कागदपत्रं, निवडणूक ओळखपत्रं असलं काहीही नव्हतं. ते सगळे जण शहरात राहणारे "अ-नागरिक' होते. दिल्ली आणि नोएडा इथं उभ्या राहत असलेल्या इमारतींच्या बांधकामावर रोजंदारीचे मजूर म्हणून ते काम करत होते. आजही दिल्लीसारख्या "विकसित' महानगरात अशा "अ-नागरिकां'ची संख्या लक्षणीय आहे. 

...तेव्हा माकडांच्या बाबतीत तर एक गोष्ट स्पष्टच आहे..."आपण विस्थापित झालो आहोत,' अशी तक्रार घेऊन ही माकडं कोणत्या पोलिस ठाण्यात जाऊन प्राथमिक माहिती अहवाल नोंदवणार? 
मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ यांच्या सीमारेषेवर असलेल्या आमच्या गावात एका आदिवासी शेतकऱ्याच्या घरी असंच एक विस्थापित झालेलं माकड येऊन राहू लागलं होतं. ते भाकरी किंवा भात खात असे. बिडी प्यायलाही ते शिकलं होतं! एवढंच नव्हे तर, आपल्या 
शेतकरी-मालकाबरोबर ते मोहाच्या फुलांची दारूही मातीच्या भांड्यातून किंवा पेल्यातून पीत असे...तो शेतकरी रानात शेळ्या-मेंढ्या चरायला घेऊन जाई, तेव्हा ते माकडही त्याच्याबरोबर जाई. आसपासच्या अशा अनेक गावांमधल्या घरांमध्ये कुणा ना कुणाकडं तरी अशी विस्थापित माकडं राहू लागली आहेत. ही माकडं आता त्या त्या घरी "पाळीव'च बनून गेली आहेत. छत्तीसगढचे आदिवासी मजूर किंवा त्यांच्या मुली जशा शहरी भागात - आपल्या वंशापासून पूर्णतः वेगळ्या असलेल्या बांधकाम व्यावसायिकांकडं, ठेकेदारांकडं- जाऊन राहिल्या आहेत व तिथल्याच झाल्या आहेत, अगदी त्याच धर्तीवर ही माकडंही आता पाळीव बनून राहू लागली आहेत. पाळीव प्राण्यांच्या गळ्यात असतो, तसा पट्टा या माकडांच्या गळ्यात नाही, एवढंच! 

दोन वर्षांपूर्वी मी आमच्या गावी, घराच्या मागच्या बाजूच्या खोलीत वामकुक्षी घेत होतो. अचानक माझी झोप मोडली. पाहतो तर काय, मी झोपलो होतो, त्या कॉटच्या बाजूलाच फरशीवर एक मोठं, जाडजूड माकड बसलेलं होतं! त्याला पाहून किंचितशी हालचाल करायचीही मला भीती वाटली. माझ्यावर त्यानं हल्ला केला असता तर! एरवीच्या माकडांपेक्षा आकारानं खूपच मोठं असलेलं, काळ्या तोंडाचं असं माकड एवढ्या जवळून मी याआधी कधीच पाहिलेलं नव्हतं. ते माझ्याकडंच पाहत होतं. मात्र, त्याच्या डोळ्यांत हिंस्र भाव अजिबातच नव्हता; होती ती अगतिकतेची भावना. बहुतेक त्याला त्याच्या टोळीतून हुसकावून देण्यात आलेलं असावं किंवा ते स्वतःहूनही आपल्या टोळीपासून दूर झालेलं असावं. एव्हाना, मला जरा धीर आला होता. मी कॉटवरून उतरलो आणि स्वयंपाकघरातून खायची वस्तू आणून त्याला दिली. त्यानंतर ते घराच्या मागच्या बाजूच्या जंगलात निघून गेलं. आता या जंगलात मोहाचे आणि अन्य वृक्ष मोजकेच उरलेले आहेत. 

आदिवासी बांधव, काळ्या तोंडाची माकडं किंवा अन्य प्राणी हे जंगलांवरच अवलंबून असतात. जंगलातल्या गोष्टींवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. आता हे जंगलच त्यांचं राहिलेलं नाही. त्यांना तिथून हुसकावण्यात आलं आहे. जसं एखाद्या मासळीला किंवा कासवाला पाण्यातून बाहेर फेकून दिलं जावं, तसं ! 
काळ्या तोंडाच्या या माकडांच्या विस्थापनाची ही कहाणी केवळ भावनात्मक किंवा पर्यावरणाशीच निगडित नाहीय. त्यांच्या विस्थापनाचा व्यापक आणि सखोल परिणाम त्या सगळ्या परिसरातल्या सामाजिक-आर्थिक जडणघडणीवर झालेला आहे. तो कसा, हे समजून घेतलं पाहिजे. या विस्थापनानं शेतीच्या अनेक प्रकारच्या पारंपरिक आणि लाभदायक पद्धती बदलून टाकल्या आहेत. या भागातल्या खेड्यांतल्या घरांची बांधकामरचना, घरांच्या बांधकामसामग्रीचं स्वरूपही या विस्थापनानं बदलून टाकलं आहे. काही समूहांचा उदरनिर्वाहाचा पारंपरिक व्यवसायही या विस्थापनानं हिसकावून घेतला आहे आणि त्याला बेरोजगार केलं आहे. 

भूक-तहानेनं व्याकुळलेल्या, वणवण नशिबी आलेल्या काळ्या तोंडाच्या माकडांनी गेल्या काही वर्षांपासून या भागातल्या अनेक गावांवर-खेड्यांवर हल्ले करायला सुरवात केली आहे. ही माकडं घरांच्या छपरांवर चढतात व घरांची कौलं तोडून-मोडून टाकतात. परिणामी, उन्हाळ्यात एप्रिल-मे-जून या तीन महिन्यांत इथल्या कुंभार समाजाचं उदरनिर्वाहाचं साधनंच हिरावलं गेल्यासारखं झालं आहे. या महिन्यांत शेतीची कामं फारशी नसतात. माठ, मातीची अन्य भांडी, कौलं तयार करण्यासाठी या समाजाला हाच काळ फुरसतीचा असतो. हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. मात्र, गावांतले, खेड्यांतले लोकही आता "टाटा'चे पत्रे किंवा कारखान्यांत तयार झालेले सिमेंटचे मोठमोठे पत्रे वापरू लागले आहेत. घर बांधण्याची सामग्री बदलू लागल्यानं त्या मागास भागातली बांधकामरचना, स्थापत्यही बदललं आहे. 

दुसरा परिणाम फळबागांवर झाला आहे. फलोत्पादनावर अवलंबून असणाऱ्यांच्या लोकांच्या कमाईवर झाला आहे. हल्लेखोर माकडांच्या टोळ्याच्या टोळ्या आमराई, पेरूच्या बागा, शेवग्याची झाडं आणि अन्य फळबागांवर तुटून पडतात. फटाके वाजवून किंवा एअरगनचे बार काढून या टोळ्यांना हुसकावून लावणंही दिवसेंदिवस अवघड होऊन बसलं आहे. कारण, अनुभवातून माकडंही शिकतात! असे आवाज आले, की ते फार लांब पळून जात नाहीत...जवळपासच पळतात आणि पुन्हा संधी साधून फळांचा फन्ना उडवतात. काही कमजोर झाडांची नासधूसही करतात. वर्षानुवर्षं चालत आलेल्या पीकपद्धतीवरही या माकडांमुळं परिणाम झाला आहे. जास्त अर्थप्राप्ती देणाऱ्या डाळींचं पीक घेणं आता शेतकऱ्यांनी जवळपास बंदच केलं आहे. तूर, हरभरा, मसूर, उडीद, मूग ही नगदी पिकं शेतकरी जवळपास आता काढतच नाहीत. 

थोडक्‍यात, बारकाईनं पाहिलं तर या काळतोंड्या माकडांनी ग्रामीण अर्थव्यवस्थाच उलटीपालटी करून टाकली आहे. आधी स्वावलंबी असलेल्या बहुतेक लोकांना पारंपरिक व्यवसाय बंद करावे लागले आहेत. आता मजुरी किंवा अन्य प्रकारची कामं करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. 

लोक म्हणतात ः विस्थापनाचा बळी ठरलेली आणि आपल्या "कुटुंबकबिल्या'सह रस्त्यावर ठिय्या देणारी आणि रोज अपघातग्रस्त होणारी माकडं "गांधीवादी' आहेत. अहिंसा, उपोषण आणि सत्याग्रह यांची अनुयायी आहेत ही माकडं..आणि जी खेड्यांवर, गावांवर हल्ले करतात, ती आहेत "माओवादी' माकडं! 

ही विचारसरणी या माकडांना कुणी शिकवली, मला ठाऊक नाही...पण या विस्थापित माकडांवर एक गंभीर स्वरूपाची डॉक्‍युमेंटरी करण्याची माझी इच्छा आहे. ही माकडं केवळ "विकासवादी उन्मादा'पायी विस्थापित झालेली आहेत. जी मंडळी सगळ्याचाच "विकास' करण्याच्या मागं लागलेली आहेत व जी देशाचं दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या योजना रोज रोज तयार करत आहेत, त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोचवण्यासाठी या विस्थापितांची, शरणागतांची कुठलीही संघटना नाही की त्यांचा कुठला राजकीय पक्षही नाही...म्हणूनही असेल कदाचित, या काळ्या तोंडाच्या विस्थापित माकडांवर डॉक्‍युमेंटरी करण्याची माझी इच्छा जरूर आहे!

सदर लेखाचे लेखक मला ज्ञात नसल्याने त्यांचा उल्लेख करू शकत नाहीये पंरतू त्यांच्या विचारांचा आदर करीत हा लेख प्रकाशित करत आहे. सविनय - शाम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा